स्टेट बॅंक कॉलनीतील समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

रत्नागिरी – शहरातील प्रभाग क्र.३ मधील स्टेट बैंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्थेबाबत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रनप गटनेते समीर तिवरेकर नगरसेवक उमेश कुळकर्णी व शहराध्यक्ष सचिन करमरकर यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

प्रभाग क्रमांक ३ मधील स्टेट बॅंक कॉलनी परिसरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. यामध्ये राजेश नेने, राजेंद्र घाग यांच्या घराजवळील गटारातील पाईप तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे रस्त्यात पाणी साचून ते रोगराईस कारणीभूत ठरत आहे. हेच पाणी प्रभागाच्या खालच्या भागातील घराजवळ तुंबून या ठिकाणी अनेकांच्या अंगणात पाणी जात आहे.

गेले अनेक दिवस गटारातील पाणी वाहून नेणारा पाईप फुटलेला आहे, त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अनेक पादचारी, वाहनधारक यांनादेखील यापासून धोका निर्माण झाला आहे. तरी यावर तात्काळ कार्यवाही करावी.

याच भागातील वायंगणकर यांच्या घरासमोरील गटार हे पूर्णपणे मातीने भरलेले असल्याने यामुळे राजेश नेने यांच्या येथून येणाऱ्या पाण्याच्या निचरा होत नाही. यामुळे वायंगणकर यांच्या अंगणातही पाणी तुंबते. वरील परिसरातील सर्व नागरिक या सर्व गोष्टीमळे त्रासलेले आहेत. या सर्व समस्येवर आपण तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी ही विनंती प्रवीण देसाई यांनी केली. निवेदन देण्याकरिता प्रवीण देसाई यांच्यासमवेत भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, गटनेते समीर तिवरेकर, नगरसेवक तथा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, नितीन गांगण, मंदार लेले आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*