सृजन कलोत्सव २०२५: दापोलीत तीन दिवसीय कला आणि सांस्कृतिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

दापोली : दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने आयोजित “सृजन कलोत्सव २०२५” या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराने कला आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन पायंडा रचला.

श्रीकृष्ण मंदिर, बाजारपेठ, जालगाव येथे आयोजित या शिबिरात १२५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. दापोलीसह मुंबई, टिटवाळा आणि चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी या शिबिरात हजेरी लावून विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण घेतले.

शिबिरात चित्रकला, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग, संगीत आणि मातीकाम या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी विद्याधर ताम्हणकर यांनी चित्रकला, श्रीराम महाजन यांनी कॅलिग्राफी, श्रीप्रीती वैद्य यांनी वारली पेंटिंग, अनिरुद्ध सुतार यांनी संगीत आणि अक्षय मांडवकर यांनी मातीकाम यांचे मार्गदर्शन केले.

या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट लहान मुलांना मोबाइल आणि डिजिटल स्क्रीनपासून दूर ठेवून त्यांच्या सर्जनशील आणि कलात्मक क्षमतांना प्रोत्साहन देणे हे होते.

शिबिरादरम्यान मुलांनी आपल्या कलाकृती आणि सादरीकरणांद्वारे आपली प्रतिभा सिद्ध केली. अनेक पालकांनी आयोजकांशी प्रत्यक्ष भेटून अशा शिबिरांच्या आवश्यकतेवर भर दिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यासारख्या उपक्रमांचे कौतुक केले.

मुलांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या भावनांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनावर शिक्कामोर्तब केले. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कौशल्ये आत्मसात केली आणि आपल्या कलात्मक अभिव्यक्तीला नवीन दिशा दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली. ऋषिकेश शेठ, तेजस मेहता, अमित मेहता, स्वामी बुटाला, कमलेश तलाठी, साहिल कडके, सिद्धेश शेठ, ऋषीकेश तलाठी, स्वप्नील मेहता, संदेश मेहता, निकेत मेहता, अथर्व मेहता, आदित्य गांधी, परेश बुटाला, निखिल तलाठी आणि शुभम शेठ यांनी नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीमध्ये मोलाचे योगदान दिले.

त्याचबरोबर, सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञाती बांधवांचे आयोजकांनी मन:पूर्वक आभार मानले. या शिबिराच्या यशामुळे भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन अधिक जोमाने करण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

शिबिराचे अध्यक्ष कुणाल मेहता आणि मयुरेश शेठ तसेच सचिव यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील उपक्रमांसाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या शिबिराने स्थानिक समुदायात सकारात्मक बदल घडवण्याबरोबरच तरुण पिढीला सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले गेलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*