खेड : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत संजय कदम यांची मुंबईमध्ये बैठक झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे. या बैठकीमध्ये पक्षप्रवेशा संदर्भातली चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील काही प्रादेशिक वृत्तवाहिन्यांनीही या संदर्भात बातमी दाखवल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच विषयाची चर्चा नाक्या नाक्यावर ऐकायला मिळत आहे.

माय कोकणच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार संजय कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती 13 मार्च रोजी सकाळी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघातून सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून संजय कदम हे 2014 साली निवडून आले होते. आमदारकीची पाच वर्ष त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर 2019 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी त्यांचा पराभव केला. 2024 साली पुन्हा एकदा संजय कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघांमध्ये कदम विरुद्ध कदम हा सामना गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यामधील वाद अनेक वेळेला विकोपाला गेल्याचंही पाहिलं गेलं आहे. परंतु सध्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, राजकारणात काही होऊ शकतं.

शिवसेनेमधूनच संजय कदम यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. मधल्या काळात शिवसेनेमध्ये वाद झाल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तिथूनच आमदार म्हणून निवडून आले.

योगेश कदम सक्रिय झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही वर्ष ते राष्ट्रवादीतच काम करत होते.

दरम्यानच्या काळात शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्यानंतर योगेश कदम हे शिंदेंच्या सोबत राहिले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा शिवबंधन बांधून शिवसेना UBT पक्षात सक्रिय झाले.

राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा संघर्ष झाला. यात संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली.

कोकणात ठाकरेंचे निष्ठावंत अशी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःची ओळख निर्माण करून घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल चिन्हावर संजय कदम यांनी निवडणूक लढवली.

परंतु, दापोली मतदार संघातील आमदार योगेश कदम यांनी त्यांचा 24 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव. या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर योगेश कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री केले.

दापोली विधानसभा मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनी मंत्री पद मिळाले. यानंतर गावागावात शहरात शहरात कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होऊ लागले.

अगदी काही दिवसांपूर्वीच दापोली नगरपंचायतीमध्ये देखील बहुमत मिळवण्यामध्ये रामदास कदम आणि ना. योगेश कदम यशस्वी झाले.

त्यांच्या विरोधात असलेल्या उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्यासह 11 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. दापोली नगरपंचायती सत्ता लवकरच शिवसेनेच्या ताब्यात येण्याची शक्यता.

त्यातच खालिद रखांगे आणि संजय कदम यांचेसंबंध सर्वश्रुत आहेत. रामदास कदम आणि संजय कदम यांच्या भेटीमागे उपनगराध्यक्षांची महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तशी चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये आहे.

माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त धडकताच त्यांच्या अनेक समर्थकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, या वृत्ताबाबत अद्यापही संजय कदम यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. तर स्थानिक शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

मधल्या काळात तर संजय कदम हे भाजपमध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू झाली होती. मात्र, सध्याच्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीमुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.