दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.
आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काही लक्षणे ओळखून त्यांचे जीवन वाचवले जाऊ शकते.
याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि जेसीआय दापोली तर्फे रविवारी, १० सप्टेंबर २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, बुरोंडी नाका, केळसकर नाका असा ६ किलोमीटरचा होता.
यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या सायकल फेरी दरम्यान आत्महत्येबद्दल जागरुकता आणि ती रोखण्यासाठीचे प्रयत्न याविषयक डॉ सुयोग भागवत, समीर कदम, फराज रखांगे, डॉ समर्थ पेंढारे, तेजस मेहता, आशिष अमृते, रित्विक बापट इत्यादींनी मार्गदर्शन केले.
आत्महत्या ही काही अचानक घडणारी घटना नाही, कारण आत्महत्या करणारी व्यक्ती ही प्रथम मानसिकरित्या आजारी पडते आणि त्याची दखल अथवा त्यावर उपाय होत नसल्यामुळे आत्महत्या वाढत असल्याचे, मनोविकार तज्ञ सांगतात.
आज प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे कारण सर्वच निराशाग्रस्त नागरिकाला समुपदेशक अथवा इतर मदत मिळतेच असे नाही.
संपर्कात असलेल्या व्यक्तीत झालेले मुख्य बदल, तसेच त्यांच्या बदललेल्या सवयी यावर आपण लक्ष दिले तर प्रत्येक नागरिक हा समुपदेशक बनू शकेल, कारण या व्यक्तीना आपले म्हणणे ऐकणारा म्हणजेच संवाद साधणारा व्यक्ती हवा असतो.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुरज शेठ, केतन पालवणकर, विनय गोलांबडे, पराग केळसकर, आमोद बुटाला, मयुरेश शेठ, प्रसाद दाभोळे, खुलेश जैन, ज्ञानेश लिमये, स्वप्निल मेहता, अनिकेश चव्हाण, अभिषेक खटावकर, राहुल जैन, ऋषिकेश शेठ इत्यादींचे सहकार्य लाभले.
दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवूया असे आवाहन आयोजकांनी केले आहे.