खेड : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथील श्रीमान द. ग. तटकरी सभागृहात सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली.

या कार्यशाळेत खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील हजारो लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान, कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना साहित्य आणि अनुदानाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत आंबये येथील श्री सुभाष पांडुरंग जाधव यांना ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. तसेच, खेड (१००००), दापोली (११०००) आणि मंडणगड (१००००) तालुक्यातील लाभार्थ्यांना आंबा फळपिकाचे फळमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप करून त्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

शेतीपिकांचे वन्य व भटके प्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी खेड (२१६), दापोली (२१६) आणि मंडणगड (२१६) तालुक्यातील लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत औषध वाटपाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत मार्च २०२३ पासून खेड तालुक्यातील ५० लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत २ कोटी ५२ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खेड तालुक्यातील २८ लाभार्थ्यांना विविध शेती अवजारांसाठी ९ लक्ष ५६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

फळपीक बागायतदारांना शाश्वत पाणीपुरवठा करता यावा यासाठी जलकुंड खोदकाम तसेच प्लास्टिक कागद अस्तरीकरणासाठी एकूण ६७ लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत १० लक्ष रुपयांचे कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले. सिंधुरत्न योजनेंतर्गत आंबा बागायतदारांना आंबा वाहतुकीसाठी २१ लक्ष ७८ हजार रुपये अनुदान रकमेची पूर्व संमती पत्रे ७ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खेड तालुक्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण ३२५ लाभार्थ्यांच्या १९२.२ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात आला आहे. पंचायत समिती सेस योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६६ लाभार्थ्यांना ताडपत्री, ३९ हेक्टर फळबाग लागवड आणि १४.० हेक्टर बांबू लागवडीचा लाभ देण्यात आला.

यावेळी आगामी खरीप हंगाम २०२५ च्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि करावयाच्या कामांसंदर्भात मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदारसंघातील कृषी व कृषी निगडीत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शासकीय विभागांच्या समन्वयाने सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन मा. दत्तात्रय सोनवळे यांनी केले. याप्रसंगी एकूण ५६४ लाभार्थ्यांना गाय/म्हैस दुधाळ गट योजनेसाठी निवडपत्रे ना. योगेश कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी माजी बांधकाम समिती सभापती जि. प. चंद्रकांत उर्फ आण्णा कदम, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी नाथराव कराड, प्रांताधिकारी खेड शिवाजी जगताप, तहसीलदार खेड मा. सुधीरजी सोनवणे, गट विकास अधिकारी खेड गणेश मंडलिक, तालुका कृषी अधिकारी खेड रविंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी दापोली हेमंत ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी मंडणगड सोमनाथ आहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
