चिपळुणात शिवप्रेमींचा विजयः पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ शब्द हटवला!

चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ हा शब्द अखेर हटवण्यात आला आहे.

या शब्दावर मराठा क्रांती प्रतिष्ठानने आक्षेप घेतल्यानंतर, चिपळूण नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करत हा शब्द हटवला.

यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चिपळूण शहरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा हे कोकणातील एक महत्त्वाचे आकर्षण आणि श्रद्धास्थान बनले आहे.

या पुतळ्याच्या नावामागे ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव लिहिण्यात आले होते.

मात्र, छत्रपतींच्या नावापुढे ‘श्रीमंत’ हा शब्द कधीच वापरला गेला नसल्याने, या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

मराठा क्रांती प्रतिष्ठानने या संदर्भात चिपळूण नगरपरिषदेकडे लेखी मागणी केली होती.

चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या मागणीची तातडीने दखल घेत, शिवजयंतीपूर्वीच पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ हा शब्द हटवला.

या निर्णयामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, मराठा क्रांती प्रतिष्ठानने मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे आभार मानले आहेत.

या घटनेमुळे इतिहासातील योग्य माहिती जपली गेली आहे, अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*