स्मार्ट मीटरची होळी करुन करणार आंदोलन : विनायक राऊत

रत्नागिरी:- स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत आम्ही हे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवायला दिले नव्हते.

मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे मीटर बसवायला सुरुवात केली आहे. हे मीटर कोणीही बसवायला देऊ नका. हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन शिवसेना येत्या 2 दिवसांत करणार आहे.

पालकमंत्र्यांच्या घरासमोरही बसून निदर्शने करणार असल्याचा इशारा माजी खासदार तथा ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.

रत्नागिरी दौऱ्यावर शनिवारी आलेल्या विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्मार्ट मीटरमुळे बिलात तिप्पट वाढ होणार याची खात्री आम्हाला आहे.

महाराष्ट्रासहित रत्नागिरीला लुटायचं काम अदानीच्या माध्यमातून हे राज्य सरकार करतंय, त्याविरोधात शिवसेना उबाठा आंदोलन करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप – उबाठा जवळीकतेबाबत विनायक राऊत यांनी म्हटलेय की, यामध्ये तथ्य असं सध्या काही नाही.

पण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे आजवरच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे, असं विधान त्यांनी यावेळी केले आहे.

साळवी स्टॉप येथील शिवसेनेची शाखा उद्धव ठाकरे सेनेचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार राजन साळवी यांची भाजपने ‘ना घरका ना घाट का’ अशी परिस्थिती करून ठेवली असल्याची टिका ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. पण राजन साळवी यांनी त्यांच्याच मनात काय आहे ते सांगावं असे म्हटले आहे.

वाडीतल्या गोंधळाचं आमंत्रण देखील राजन साळवी यांना पाठवलं होतं. माझी तक्रार पक्षप्रमुखांकडे ते करू शकतात, पक्षप्रमुखांनी काय सांगितलं हे वर्तमानपत्रात छापून आलं आहे.

आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावरती फोडणं सोपं आहे, पण यश संपादन करणं कठीण आहे. यश मिळवण्यासाठी राजन साळवी यांनी आत्मचिंतन करावं असाही सल्ला राऊत यांनी दिला आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेचे भवितव्य मुंबई महानगरपालिके पुरतच आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अजून सहा महिने चालेल जाणाऱ्यांनी जर खड्डय़ात उडी मारायचं ठरवलं असेल तर त्यांना शुभेच्छा. 

बोगस कंपनी तयार करून 42 हजार कोटींची गुंतवणूक या ठिकाणी करण्यात आली आहे.

लोकांना फसवण्याचे उद्योग थांबवा आणि मग ऑपरेशन टायगर सुरू करा, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.

ऑपरेशन टायगर म्हणणाऱ्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दाओसमध्ये जाऊन बोगस करार केलेत. आता दुसऱ्यांचा पक्ष फोडणे हाच उद्योग मंत्रांना उद्योग उरला असल्यी टिकाही विनायक राउत यांनी केली आहे.

ज्यांनी बाजारात आपल्याला विकायला ठेवलं आहे ते विकले जातील. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरती आमचा पक्ष उभा राहील असे राऊत यांनी म्हटले आहे.

गद्दारांशी आम्ही कधीही जवळीक करणार नाही. शिवसेना पक्ष सोडून जे गद्दार आणि बेईमान गेले त्यांच्याशी जवळीक करणं कदापी शक्य नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*