दापोलीत शिवसेनेतील अपक्ष उमेदवारांवर पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.दि. १३ रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी औपचारिकता म्हणून शिवसेना पक्षाच्या बैठका घेऊन अधिकृत उमेदवारांना सहकार्य करायचे, असे ठरवले जात आहे. प्रत्यक्ष मात्र अपक्ष उमेदवारांचे अंतर्गत मनोबल वाढवून शिवसेनेत फूट कायम ठेवायची अशी रणनीती देखील एकीकडे आखली जात आहे, अशीही चर्चा आहे. यावर शिवसेनेतील वरिष्ठ मंडळी दापोलीतील या उघड बंडखोरीला नेमका लगाम कसा घालणार? याकडे देखील दापोलीचे लक्ष लागले
आहे. दापोली नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ५ अधिकृत उमेदवार असून शिवसेनेची उमेदवारी न मिळालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या ८ आहे. या अपक्ष उमेदवारांत शिवसेनेतील काही माजी नगरसेवक देखील आहेत. या अपक्ष उमेदवारांची उमेदवारी अपक्ष असली तरी त्यांची रोजची उठबस ही शिवसेना कार्यालयात असते. याची सर्व माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे काम दापोलीतून होत आहे, अशी माहिती शिवसेनेतील अंतर्गत गोटातून मिळत आहे.