रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सर्व गावांना बसला.

यामुळे मोठया प्रमाणावर हानी झालेली आहे. रविवारी दुपारी साधारण 12 च्या सुमारास सदर वादळानं रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्याच्या स्थितीनंतर वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठया प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटुन विद्युत पुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार रत्नागिरी व राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तथापि जिवीत हानीचे वृत्त नाही. जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

सांयकाळी 05 वा. च्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 किमी प्रती तास वाढण्याचा अंदाज बघुन तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम प्रशासनाने केले. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावात मोठया प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.