चिपळूण : स्वतःला पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली. ही घटना १७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास खेडेकर संकुल शिवनदी पुलाजवळ आणि खेर्डी प्रभात हॉटेल समोरील रोडवर घडली.
याप्रकरणी अशोक पोपटराव साठे (वय ६४, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. पाग जोशी आळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक साठे आणि साक्षीदार मोहन विष्णू चोचे हे खेडेकर संकुल शिवनदी पुलाजवळ तसेच खेर्डी प्रभात हॉटेल समोरील रोडवर असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले.
या व्यक्तींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले आणि तपासणीच्या नावाखाली फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडील सोन्याचे दागिने पांढऱ्या कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगितले. यानंतर आरोपींनी हातचलाखी करत ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये २५ ग्रॅम वजनाची डिझाइनची सोन्याची चैन (किंमत १ लाख रुपये), १० ग्रॅम वजनाची बदाम डिझाइनची सोन्याची अंगठी (किंमत ४० हजार रुपये), १० ग्रॅम वजनाची निलांबर खडा असलेली सोन्याची अंगठी (किंमत ४० हजार रुपये) आणि ३५ ग्रॅम वजनाची चपट्या डिझाइनची सोन्याची चैन (किंमत १ लाख ३० हजार रुपये) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच अशोक साठे यांनी १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), २०४ आणि ३(५) नुसार दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.