दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे नुकतेच इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन दुसर्‍या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

एका विशेष समारंभात या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य मोहन मुळे यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभासाठीच्या व्यासपीठावर चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, मुख्याध्यापक मनोज वेदक, अंगणवाडी सेविका आशा मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सातवीतील विद्यार्थ्यांबद्दलचे अनुभव, आठवणी शेअर केल्या. याशिवाय इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेबद्दलच्या आठवणी व ऋण व्यक्त केले.

इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, मनोज वेदक, रुपेश बैकर, मोहन मुळे आदींनी मनोगतातून विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आशा मुळे यांचाही चंद्रनगर शाळेच्या वतीने सेवानिवृत्तीपर सन्मान करण्यात आला.