दापोली : शिक्षण संस्था म.ल.करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर यांच्या सहकार्याने दर शनिवारी विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे सचिव सुरेंद्र शिंदे व राष्ट्रीय पंच कविता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे.

शहरी भागात पैसे खर्च करून मुले कराटे, लाठी काठी अन्य साहसी खेळाचे प्रशिक्षण घेतात.

मात्र ग्रामीण भागात तसे प्रशिक्षण मिळत नाही म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाठी काठी या खेळाचा लाभ मिळावा या उद्देशाने संस्थेने भागशाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लाठी काठी प्रशिक्षण सुरू केले आहे.

लाठी प्राचीन मर्दानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा खेळ आहे. सध्याच्या प्रशिक्षणातून मुलींना स्वरक्षणा बरोबरच व्यायामसाधना त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वीरवृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढविणे, चापल्य व कौशल्य वाढवणे असल्याचे शिक्षिका एम.के.साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.