दापोली:- निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. निलीमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

१ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या निलीमा चव्हाण अकस्मात मृत्यू प्रकरणी दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत होते.

या प्रकरणात आता अनेक बाबी समोर आल्या आहेत. निलीमा हिच्या व्हीसेराची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे.

तसेच मृत्यूचे अंतिम कारण हे “Asphyxia due to drowning” असे नमूद केले आहे. आत्तापर्यंत पोलीसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली.

या अकस्मात मृत्यूचा पोलीस तपास सुरू असताना दिनांक 17 ऑगस्ट रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथून दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला.

भा.द.वि. कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. १५ एप्रिल ते दि. २९ जुलै या मुदतीत निलीमा ही दापोली येथील ज्या स्टेट बँकेमध्ये काम करत होती, त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड (मूळ रा. – कोल्हापुर) याला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लागत असे व ऑफिसमध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असताना देखील फोन करत होते

निलीमा हिला दिवसाला 4 ते 5 डिमॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत होता. याबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी तिचे वडील आणि तिचा भाऊ अक्षय यास निलीमा सांगत होती.

प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने निलीमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता. निलीमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती. यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती. घरामध्ये व्यवस्थित जेवत नसलेबाबातही देखील फिर्यादी मध्ये नमूद केले आहे…

सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं 17/2023 भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये भा.द.वि. संहिताचे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे तसेच यातील आरोपि संग्राम सुरेश गायकवाड (वय 26, मुळ राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार, टी.आर.पी, रत्नागिरी) यास गुन्ह्याच्या कामी दिनांक १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.