21 ते 25 मार्च पर्यंत राहणार प्रदर्शन
रत्नागिरी, दि. 20 (जिमाका):- उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 25 मार्च या कालावधीमध्ये दापोलीतील आझाद मैदानावर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

नव तेजस्विनींनी आपल्या कौशल्याने बनविलेल्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आणि आपली समृद्ध संस्कृती व परंपरा जपणाच्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी स्वयंरोजगारातून उत्पादित केलेल्या विविध मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते.
विक्री व प्रदर्शनामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या विक्री व प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातीत एकूण 75 स्वयंसहायता समूह सहभागी होणार आहेत.
दापोली येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. त्याचा फायदा उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास होईल.

प्रदर्शन कालावधीत संध्याकाळी स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांचे मनोरंजनपर लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
सहभागी स्टॉल प्रतिनिधी करीता फनी गेम आयोजित करण्यात येणार आहेत.
22 मार्च रोजी सहभागी स्वयंसहायता समूहातील उत्कृष्ट काम केलेले बँक शाखाधिकारी, महिला, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त प्रभागसंघाचा आदींचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा सांगता समारंभ 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समूहाचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.