कोरोनाच्या काळात लोटे येथील घरडा कंपनी व परिसर बंद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह त्यांनी खेडचे प्रांत अविनाश कुमार सोनावणे यांना निवेदन दिलं. यावेळी खेड शहरध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, सुनिल शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोटे M.I.D.C येथे घरडा कंपनीमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यात घरडा कंपनीमध्ये काम करणारा मोठा वर्ग खेड/लोटे परीसरातून येतो. माय कोकणला प्रतिक्रिया देताना संजय कदम म्हणाले की,
घरडा कंपनीमुळे लोकांचं जीव धोक्यात आलं आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात कोरोना पसरला आहे. तरी देखील कंपनी अद्यापही बंद होत नाहीये. परीसर सील केलं जात नाहीये हे गंभीर आहे. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे जर कोरोना पसरत असेल तर कंपनी व्यवस्थापनावर कारवाई झाली पाहिजे.
लोटे परिसरामध्ये ज्या वेगानं कोरोना पसरत आहे त्याचा विचार करून शाससाने तात्काळ ही कंपनी व परीसर बंद करावा. अन्यथा कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावाला कंपनी व प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलं आहे.