दापोली : शहारातील वडाचा कोंड येथील शिवाजी शिगवण यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन अभिनंदन केलं.
या प्रसंगी दापोली नगरपंचायत नगरसेवक विलास शिगवण, जेष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील, खेर्डी युवा मंच अध्यक्ष शैलेश कदम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट दापोली येथील शिवाजी राजाराम शिगवण यांना जाहीर करण्यात आली आहे.
ही प्रतिष्ठित डॉक्टरेट शिवाजी शिगवण यांना त्यांच्या शैक्षणिक, कृषी आणि सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल जाहीर करण्यात आली आहे.
शिवाजी शिगवण यांच्या संशोधन वृत्तीमुळे शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रात विकासाची समज लक्षणीयरीत्या वाढली आहे. नैतिक मूल्यांचे पालन करत शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात शिवाजी शिगवण यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि वचनबद्धता आहे, असे विद्यापीठाने याबाबतच्या पत्रात म्हटले आहे.
पुढील महिन्यात शिवाजी शिगवण यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटीकडून ही मानद डॉक्टरेट दिल्ली येथे पदवीदान समारंभात देण्यात येणार आहे.
शिवाजी शिगवण हे सध्या आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सभापती, महात्मा फुले समता परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा दापोलीचे अध्यक्ष आहेत.
शिवाजी शिगवण हे कृषी पदवीधर असून ते कृषी विस्तार अधिकारी पदावरून १९९४ साली निवृत्त झाले. त्यांना डॉक्टरेट घोषित झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.