दापोली : तालुक्यातील आडे गावातील सोटेपीर दर्ग्यावर अज्ञात समाजकंटकांनी भगव्या रंगाचे झेंडे लावले. यावरून गावामध्ये कमालीचे तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी दोन्ही समाजाची बैठक घेऊन यावर सामंजस्याची भूमिका घेतल्याने आता गावातील तणाव निवळला आहे.
दापोली तालुक्यातील केळशी जवळ असणारे आडे गावात सोटेपीर बाबा हा प्रसिध्द दर्गा आहे. हा दर्गा रस्त्यालगत आहे. हा दर्गा हिंदू, मुस्लिम व कोळी समाजाचे देखील श्रद्धास्थान आहे. असे असताना देखील या दर्ग्यावर भगव्या रंगाचे झेंडे जाणून-बुजून लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यानंतर जमातुल मुस्लीमीन, आडे मोहल्ला यांनी दापोली पोलीस स्थानकात मुस्लीम समाजाच्या दर्गेवर अन्यरंगाचा झेंडा लावण्याचा गैरव्यवहार झाल्याबाबत अर्ज देखील दिला. यात त्यांनी नमूद केले आहे की सदर दर्गा जाफर सिद्दीक मरजान (सोटेवाले) यांचा हा दर्गा प्राचिन काळापासून या ठिकाणी असून त्यांची देखभाल,
दिवाबत्ती, उद व उर्स पारंपारिकरित्या आडे गावातील मुस्लीम समाज करतो. ही परंपरा खूप वर्ष चालत आली
आहे.
ही जागा मोहल्ला मुस्लीम कब्रस्तानाची असून ७/१२ वर व शासन दरबारी नमूद आहे. सर्व धर्मीय श्रद्धा या दरग्यावरती पांरपारिक आडे मुस्लीम समाजाचा विधी व देखभाल करण्याचा अधिकार आहे. असे असताना देखील दर्ग्यावर केसरी रंगाचे झेंडे अज्ञात इसमाने जाणूनबजुन भावना दुखावण्यासाठी लावले आहेत.
या दर्ग्यावर मुस्लीम समाजाचा हिरवा झेंडा नसून अज्ञात व्यक्तीने केसरी रंगाचे झेंडे लावले होते. ही अज्ञात व्यक्ती दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गावातील सलोख्याचे जे संबंध आहेत त्याला गाळबोट लावण्याचा कोणीतरी व्यक्ती जाणून बुजून प्रयत्न करीत आहे असे नमूद करून हे झेंडे काढून टाकावे अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलीस स्थानकात दिलेल्या अर्जात केली.
या नंतर शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भगव्या रंगाचे झेंडे काढले. शिवाय हे झेंडे कुणी लावले याचा परिसरात तपास देखील केला. मात्र भगव्या रंगाचे झेंडे दर्ग्यावर लावणारा समाजकंटक पोलिसांनी सापडून आला नाही.
या गंभीर प्रकारामुळे आडे गावातील वातावरण दोन दिवसांपासून कमालीचे संतप्त झालेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी व गावांमध्ये शांतता राहावी याकरिता दापोलीत पोलिसांच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी हा वाद आला मिटला असल्याचे सांगितले.