राजापूर : काँग्रेस पक्षाला आज राजापूर तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. राजापूर-लांजा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नईद काझी यांनी आपल्या अनेक प्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना नईद काझी म्हणाले की, “शिवसेना पक्ष हा विकासाभिमुख असून जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असतो. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेले काम पाहून आम्ही प्रभावित झालो आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

पालकमंत्री उदय सामंत यांनी काझी यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. ते म्हणाले की, “राजापूर तालुक्यात शिवसेना मजबूत होत असून युवक वर्ग मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहे. नईद काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल.”
नईद काझी यांच्यासह युवक सेनेचे उपाध्यक्ष नायब बांधीलकर, एजाज बांधीलकर, मेहबूब वागू, सनद काझी, सनत काजी, साहिल बांधिलकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला.
प्रत्येक कार्यकर्त्याला आदर आणि संधी मिळेल – आमदार किरण सामंत
आमदार किरण सामंत यांनी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. “शिवसेना पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर आणि संधी मिळेल. आपण सर्वांनी एकत्र येऊन मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायचे आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विलास चाळके, बंड्या साळवी, बाबू म्हाप, स्मितल पावसकर, दीपक नागले यांच्यासह राजापूर आणि लांजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

