रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम करणाऱ्या निलेश कदमची अन्अपेक्षित एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता पण असं काही होईल याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. त्याच्या जाण्यानं पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे.
निलेश कदम हा अतिशय कष्टाळू, मायाळू आणि हसतमुख होता. तो स्वभावाने हळवा आणि प्रेमळ होता. मधल्या काळात त्याच्या पायाचं दुखणं वाढलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन करणं आवश्यक बनल होतं. मुंबईमध्ये त्याचं यशस्वी ऑपरेशन झालं देखील. तो बराही होत होता. पण अचानक त्याची तब्येत बिघडली आणि निलेशने कायमचा निरोप घेतला.
निलेश कदम हा सध्या झी चोवीस तास या वृत्तवाहिनीत व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून कार्यरत होता. गेल्ला पाच वर्षांपासून तो या वृत्तवाहिनी सोबत होता. दूरदर्शन, साम टिव्ही सोबतही त्याने काम केलं होतं. दूरदर्शनपासून त्याने कामाला सुरुवात केली होती.
मजगाव हे निलेशचं मुळ गाव. घरची शेती करून आठ किलोमिटरवरून येवून पत्रकारितेमध्ये त्यांने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आजपर्यत जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या होत्या. चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्याात आलेल्या वादळाचं कव्हरेज त्यानं केलं होतं. निलेशला आपल्या कामाच्या प्रचंड श्रद्धा होती.
त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई असा परिवार आहे. निलेशला सर्व पत्रकार परिवारातर्फे आदरांजली!