रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी दापोली नगरसेवक सचिन मनरंजन जाधव यांची शिफारस करण्यात आली आहे.  गृहराज्यमंत्री व दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नांनी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारसीनं त्यांचं नाव लवकरच जाहीर होणार आहे. त्यांच्या निवडीची औपचारिकता फक्त बाकी राहिली आहे

ही नियुक्ती जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची मानली जाते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर विकासकामांना गती मिळते.

सचिन मनरंजन जाधव हे दापोली तालुक्यातील मु. पो. नर्सरी रोड येथील रहिवासी असून, ते दापोली नगर पंचायतीचे माजी  नगरसेवक आहेत.

राजकीय वर्तुळात ते शिवसेना नेते रामदास कदम व
राज्यमंत्री योगेश कदम यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत. २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून (एनसीपी) पदाचा राजीनामा देऊन त्यांनी रामदास कदम व ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

सचिन जाधव यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांची जिल्हा नियोजन समितीवरील होणारी नियुक्ती ही शिवसेना कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.

ते स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर नेहमी सक्रिय असतात आणि दापोलीतील विविध विकास प्रकल्पांसाठी प्रयत्नशील राहिले आहेत.

जिल्हा नियोजन समितीचे कार्य व महत्व: जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee – DPC) ही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली एक महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे, जी भारतीय संविधानाच्या ७४व्या दुरुस्तीद्वारे (१९९२) अनुच्छेद २४३ झेडडी अंतर्गत बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात हा अधिनियम १९९८ मध्ये लागू करण्यात आला असून, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली आहे.

या समितीचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पंचायत समित्या, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा एकात्मिक आराखडा तयार करणे आहे.

या समितीचे अध्यक्षपद जिल्ह्याचे पालकमंत्री भूषवतात, तर जिल्हाधिकारी हे सदस्य-सचिव म्हणून कार्यरत असतात.