आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागाच्या निर्णयाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीचं वय आता 60 वरुन 62 केलं आहे. कोविड पार्श्वभूमीवर लक्षात घेता एक दोन वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.

तसेच पुढील तीन ते चार दिवसात आणखी एक जाहिरात येईल. त्यात 1000 डॉक्टर भरले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणावर जागा भरून काढत आहेत. तिसरी लाट आली तर त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

5 वर्षांनी पुन्हा सेवानिवृत्ती वय वाढवलं

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजेनतील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव आज आरोग्य विभागाकडून कॅबिनेटमध्ये मांडला आला. याआधीही वयोमर्यादा सुरुवातीला 58 होती मग ती 60 करण्यात आली आणि आता 62 वर जात आहे. सध्याची परिस्थिती राज्याला अधिकाऱ्यांची असलेली गरज लक्षात घेता हा निर्णय घेत असल्याचं कळतंय. या निर्णयामुळे अनेक अधिकारी वर्गाला तसेच राज्याच्या आरोग्य सेवेला फायदा होणार आहे. याआधी 60 वयोमर्यादा करण्याचा निर्णय 31 मे 2015 ला करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 5 वर्षांनी पुन्हा हा निर्णय घेण्यात येतोय.

वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती

वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यात गट अ ते गट क या विभागातील एकूण 15 हजार 511 पदे ही लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार असल्याचं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*