दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

नद्यांना पूर येऊन पाणी शेतात, वस्तीत शिरून खूप मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी दरड कोसळून, झाडे पडून घरांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील किरांबा येथील गावातील डोंगराला ५ ते ६ फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा डोंगर धोकादायक ठरत आहे.

येथील ग्रामस्थांच्या हे निदर्शनास आल्यावर येथील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. येथील डोंगराला भेगा पडत गेल्याने लगतच्या रस्त्याला देखील भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता देखील बंद केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी किमान एक किमीची पायपीट करावी लागत आहे. यातच शासनाने त्याठिकाणाहून स्थलांतर करण्याचे आदेश लोकांना दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.