दापोली : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक-कर्मचारी क्रीडा स्पर्धेअंतर्गत दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेचे शिक्षक रविराज हांगे यांनी तालुका व विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी थेट निवड पटकावली आहे. त्यांच्या या यशामुळे दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

रविवार, ८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दापोली येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हिवाळी क्रीडास्पर्धेच्या नियोजन व प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान रविराज हांगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तज्ञ शिक्षकांनी विविध खेळांबाबत मार्गदर्शन केले.

गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे म्हणाले, “रविराज हांगे यांच्या निवडीमुळे संपूर्ण दापोली तालुक्याला अभिमान वाटत आहे. शिक्षकांनीही मैदानात उत्कृष्ट कामगिरी करावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.”

कार्यक्रमास व्यासपीठावर विस्तार अधिकारी बळीराम राठोड, नजीर वलेले, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, केंद्रप्रमुख सुनिल कारखेले यांच्यासह तालुक्यातील शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.