मुंबई – भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड केली आहे.

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

या क्षणापासून आता रविंद्र चव्हाण भाजप पक्षाचा कारभार हाकणार आहेत. महायुतीच्या नव्या मंत्रीमंडळात चव्हाणांना स्थान मिळाले नाही.

त्यानंतर त्यांनी नाराजी न व्यक्त पक्ष जो आदेश देणार त्याचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांना पक्षसंघटनेत मोठे पद मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही.

दरम्यान, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता मंत्रीपदाची धुरा असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

त्यानंतर आता पक्षसंघटनेची सूत्र आता रविंद्र चव्हाणांच्या हाती असणार आहेत. दरम्यान, बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत.

रविंद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आता चव्हाण यांच्या रूपाने मराठा कार्यकारी अध्यक्ष बनवून भाजपाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

आजपासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन होणार असून तत्पूर्वी केंद्रीय भाजपाने रविंद्र चव्हाण यांना नवी जबाबदारी दिली आहे.