रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे.

मात्र, कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी टंचाईचा धोका वाढला आहे.

त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराला दररोज १५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या रत्नागिरीत १०,४०० नळ जोडण्या असून, शीळ धरणातून या सर्व जोडण्यांना पाणी पुरवले जाते.

मंगळवारी (२५ मार्च) धरणातील जलसाठा १.८६३ द.ल.घ.मी. इतका नोंदवला गेला.

हा साठा पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत पुरेल, परंतु बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

शिमगोत्सव आणि रमजान उपवासाच्या काळात गेल्या सोमवारी (२४ मार्च) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला नव्हता.

परंतु, आता ३१ मार्चपासून पुढील प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी असा निर्णय घेतला जातो.

यंदाही तीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी नगर परिषदेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*