रत्नागिरी: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने रत्नागिरी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाने रत्नागिरीकरांना अक्षरशः वेड लावले असून, सिटीप्राईड चित्रपटगृहात या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांतच दीड कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, पुढच्या रविवारपर्यंतचे या चित्रपटाचे सर्व शो पूर्णपणे भरलेले आहेत.
सिटीप्राईड चित्रपटगृहातील तिन्ही थिएटर्समध्ये दररोज १४ शो दाखवले जात आहेत.
या थिएटर्सची एकूण आसनक्षमता ६९० असून, तरीही सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत.
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटातील दमदार अभिनय, प्रभावी संवाद आणि भव्य दृश्यांमुळे तरुण पिढीसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहून रत्नागिरीकर प्रेक्षक भारावून गेले आहेत.