पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६’ या स्पर्धेत रत्नागिरीच्या आरना अमन देओळेकर हिने सुवर्ण कामगिरी केली आहे.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) यांच्या अधिपत्याखाली आगामी राष्ट्रीय स्पर्धांच्या निवड चाचण्यांसाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अ‍ॅक्वा टेक्निक्स रत्नागिरी स्विमिंग क्लबची जलतरणपटू आरना हिने अंडर-६ मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय या प्रकारांमध्ये तब्बल ३ सुवर्णपदके पटकावली आहेत.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच एका जलतरणपटूने ३ सुवर्णपदके जिंकत अंडर-६ मुलींच्या गटात ‘इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप’ मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

आरनाच्या या घवघवीत यशामागे तिची कठोर मेहनत, नियमित सराव आणि अ‍ॅक्वा टेक्निक्स रत्नागिरी स्विमिंग क्लबचे संचालक व प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण कुटुंबासह रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.