रत्नागिरी:- येथे गुढीपाडव्यानिमित्त सलग २१ व्या वर्षी आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका आणि सुंदर सजावटीने शहराचे वातावरण भगवेमय झाले.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या हिंदू बंधू-भगिनींनी या यात्रेला उत्साहपूर्ण वळण दिले. या स्वागतयात्रेत जवळपास ५० हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते.
विशेषतः भव्य हनुमंताच्या सजीव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी ९ वाजता श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने ग्रामदेवता मंदिरापासून समाजमंदिरापर्यंत यात्रेला सुरुवात झाली.
त्याचवेळी शहरातील मारुती मंदिरापासूनही चित्ररथांची मिरवणूक निघाली. या दोन्ही यात्रा जयस्तंभ येथे एकत्रित झाल्या.
मार्गावर दुभाजकांवर गुढ्या आणि भगवे ध्वज उभारण्यात आले होते. यात्रेची सांगता श्री पतितपावन मंदिरात झाली, जिथे हिंदुत्वाची शपथ घेण्यात आली.
यात्रेत विविध आकर्षक चित्ररथ सजवण्यात आले होते. त्यापैकी भव्य श्री हनुमानाचा देखावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध या सजीव देखाव्यांनी विशेष लक्ष वेधले. याशिवाय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नगारा, प्लास्टिकमुळे गायींच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा देखावा, श्री सिद्धिविनायक चक्रीभजनी मंडळ, श्री काशी विश्वेश्वर देवस्थान, राष्ट्रीय सेवा समिती, संस्कृत भारती, कलारंग निर्मित गर्जतो महाराष्ट्र, मरुधर विष्णू समाज, अरुअप्पा जोशी स्मृती चित्ररथ, श्रीमान भागोजीशेठ कीर प्रतिमा, श्रीराम मंदिर मारुतीराया रथ, इलेक्ट्रिक व्यापारी संघ, पतंजली योग समिती, श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडनाईट, खल्वायन संस्था, स्वयंभू श्री काशीविश्वेश्वर देवस्थान, कॅपसन (कोटा) इन्स्टिट्यूट, नाभिक प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण, टू व्हीलर मोटार मेकॅनिक असोसिएशन, विश्व हिंदू परिषद, नर्सिंग कॉलेज, विठ्ठल मंदिर संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, खालची आळी यांचा स्वच्छता चित्ररथ यांनी सहभाग घेतला.
शिवरुद्रा ढोल पथक, ब्रह्मनाद ढोल पथक आणि शिवगर्जना ढोल पथकांनी आपल्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. रत्नागिरी जिल्हा हिंदू कटबू समाज व भ. वि. जाती जमाती कल्याणकारी संघ, भारत माता चित्ररथ, बालरंगभूमी परिषद, स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक अध्यात्मिक संस्कार केंद्र, संस्कृत भारती, संस्कार भारती, क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी राजस्थान क्षत्रिय संघ, पांचाळ सुतार समाज मंडळ, हिंदु जनजागृती समिती, पाटीदार सनातन समाज यांसारख्या विविध संघटनांच्या चित्ररथांनी यात्रेत रंगत आणली.
या प्रसंगी श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, सर्व विश्वस्त मंडळी, मनु गुरव, पतितपावन संस्थेचे उन्मेष शिंदे, माजी आमदार राजन साळवी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.