
मुंबई : राज्यातील ‘दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने सर्वोत्तम ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते.
७ विविध तांत्रिक घटकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरीने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवले.
नितीन बगाटे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात २४ लोकाभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपक्रम राबवले आहेत.
यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि चॅटबॉटचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
‘रेड्स ॲप’ मधील एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ७ बेपत्ता व्यक्तींचा शोध लागला असून ५ अनोळखी मृतदेहांची ओळख पटली आहे.
‘मिशन जीवन’ मधून ५०,८०३ एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करून पोलीस त्यांच्या घरी जाऊन वाढदिवस साजरे करत आहेत.
‘रत्नसेतू चॅटबॉट’ द्वारे व्हॉटसॲपवर (९३७१४१५६१२) तक्रार नोंदणी व महिला सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘मिशन संवेदना’ अंतर्गत महिला व बालकांवरील अत्याचाराच्या ७३ गुन्ह्यांत ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
‘बंदोबस्त ॲप’द्वारे लाईव्ह ट्रॅकिंग, ‘मिशन प्रगती’ मधून फिर्यादींना एसएमएसद्वारे तपासाची माहिती आणि ‘मिशन गती’ अंतर्गत १,६०४ गुन्ह्यांचा तपास विहित मुदतीत पूर्ण झाला आहे.
अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन फिनिक्स’ मधून ७० आरोपींना अटक करून ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘डिजिटल गाववारी’ आणि ‘मिशन परिपूर्ती’ यांसारख्या उपक्रमांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

Leave a Reply