रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘७ कलमी कृती कार्यक्रमा’ अंतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिना’चे आयोजन केले होते.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे पार पडला.

रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या ‘भरोसा कक्षा’कडे प्राप्त झालेल्या सात अर्जांवरील अर्जदार आणि प्रतिवादींना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. यासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती, ज्यात पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी आणि भरोसा कक्षातील सदस्यांचा समावेश होता.
या पथकांनी समुपदेशन करून अनेक कौटुंबिक वादांवर यशस्वीरित्या तोडगा काढला. धनंजय कुलकर्णी आणि जयश्री गायकवाड यांनी कौटुंबिक वादांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.

या तक्रार निवारण दिनाला ५० हून अधिक नागरिक उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आलेल्या ५४८ तक्रारी अर्जांपैकी ५४७ अर्जांचे निराकरण करण्यात आले असून एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी आणि पोलीस-नागरिक संबंध सुधारण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.