रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला, राजीवडा, रत्नागिरी येथे छापा टाकून 11 ग्रॅम वजनाच्या ब्राउन हिरोईनच्या 175 पुड्या आणि इतर साहित्य जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत 90,500 रुपये आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, 24 जुलै 2025 रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना दोन संशयित इसम हातात पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळले.

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत त्यांच्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये ब्राउन हिरोईनच्या 175 पुड्या आणि विक्रीसाठी आणलेले इतर साहित्य आढळून आले.

या प्रकरणी दोन संशयित, मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर, दोघेही राजीवडा येथील रहिवासी, यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 11 ग्रॅम ब्राउन हिरोईन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे.

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहायक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार शांताराम झोटे, नितीन डोमणे, बाळू पालकर, वैष्णवी यादव, भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर, योगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांचा समावेश आहे.

रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले असून, अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.