रत्नागिरी : रत्नागिरीचे बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी दुबई येथे आयोजित ओशनमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि रत्नागिरीचे यशस्वी प्रतिनिधित्व करीत १० किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करून प्रतिष्ठित ओशनमॅन किताब पटकावला आहे.

राहुल भोसले यांनी सांगितले की, मला लहानपणापासून पोहण्याची आवड होती आणि गावातील विहिरीपासून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. यापूर्वी ३ किमी व ५ किमी समुद्री स्पर्धा पूर्ण केल्यानंतर काही काळ फिटनेसपासून दूर राहिलो होतो. मात्र, निश्चय फिटनेसचे डॉ. नितिन सनगर यांची भेट झाल्यानंतर फिटनेसचा प्रवास पुन्हा सुरू झाला. यामध्ये अभिजीत पड्याळ यांच्यासारखा प्रोत्साहन देणारा मित्र, स्विमिंग कोच विवेक विलणकर, कोकण कोस्टल टीम तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे मॅरेथॉन आणि ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो.
डॉ. नितिन सनगर यांच्याशी झालेल्या चर्चेत ओशनमॅन स्पर्धेची कल्पना आली आणि त्यांनी विचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लगेच नोंदणी केली आणि सराव सुरू केला.

डॉ. नितिन सनगर आणि कोच विवेक विलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ओपन वॉटर स्विमिंगची तयारी सुरु केली होती. पहिला इव्हेंट गोव्यात नोंदवला होता, मात्र तो रद्द झाला.

नंतर ही स्पर्धा दुबईत होणार असल्याचं त्यांना कळालं. दुबईतील बुरज अल अरबजवळील काइट बीचवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जगभरातील ६० पेक्षा अधिक देशांच्या स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.

ओपन वॉटर स्विमिंगमधील जगप्रसिद्ध स्पर्धा असलेल्या ओशनमॅनमध्ये अरेबियन समुद्रात पोहण्याचा राहुल भोसले यांचा हा पहिलाच अनुभव होता.

इतर स्पर्धकांनी दोन दिवस आधी सराव केला होता, मात्र उशिरा पोहोचल्याने त्यांना सराव करता आला नाही. तरीही गणपती बाप्पांच्या जयघोषाने त्यांनी स्पर्धेला सुरुवात केली.

उसळणाऱ्या लाटा आणि अनिश्चित प्रवाहांमुळे यंदाची स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. प्रत्येक लाट एक आव्हान तर प्रत्येक श्वास आत्मविश्वास देणारा होता.

अशा कठीण परिस्थितीत १० किमीचा पल्ला निर्धारित वेळेत पूर्ण करून राहुल यांनी ओशनमॅन किताब पटकावला. स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला आणि ते भावुकही झाले.

सर्वप्रथम कुटुंबीयांना याची बातमी दिली. पत्नी, मुले, आई-वडील यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे ते म्हणाले.

रत्नागिरीतून हा किताब मिळवणारे ते पहिलेच असल्याने मित्रपरिवाराकडूनही कौतुकाचे फोन आले. हा विजय केवळ वैयक्तिक नसून कुटुंबाचा, मार्गदर्शकांचा आणि रत्नागिरीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणतीही स्पर्धा ही स्वतःमधील क्षमतेची ओळख करून देणारे निमित्त असते. शरीर निरोगी ठेवा, आव्हाने स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करा, असा संदेश राहुल भोसले यांनी दिला.