दापोली : राष्ट्र सेविका समितीच्या दापोली तालुका शाखेचा बाल, तरुणी आणि गृहिणींसाठी आयोजित एकदिवसीय निवासी वर्ग १३ व १४ सप्टेंबर रोजी दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात ७६ सेविकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या वर्गात विविध खेळ, लेझीम, कविता, स्वसंरक्षण प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यांनी बौद्धिक सत्रात सर्व पूर्व प्रमुख संचालिकांच्या जीवनचरित्राची माहिती सादर केली.

नव्या पिढीला भजन परंपरेची ओळख व्हावी आणि त्यातील आनंद अनुभवता यावा यासाठी प्रगती महिला मंडळ, दुबळेवाडी, गिम्हवणे यांच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यात ‘थोडी फार सेवा घ्यावी पदरात’, ‘हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ आदी भजने सादर झाली.

शिबिरार्थी मुलींनी टाळ्या आणि तालाच्या ठेक्यावर उत्साहाने फेर धरले.

जिल्हा सहकार्यवाहिका सौ. मंजुषाताई वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ सेविकांच्या हस्ते देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावरील छोटी पुस्तिका भजन सादर करणाऱ्या महिलांना भेट देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी आणि उत्साहपूर्ण होण्यासाठी तालुका कार्यकारिणी, शिक्षिका आणि व्यवस्थापकांनी विशेष परिश्रम घेतले.