संगमेश्वर – तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी दत्तात्रय लऊ रहाटे (३१) व गणेश लऊ रहाटे (३०) या दोन संशयित तरुणांना अटक केली आहे.
याबाबत देवरुख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन संशयित तरुण सख्खे भाऊ आहेत. त्यांनी दि. १९ मार्च ते सप्टेंबर २०२० या कालावधीत शेजारी राहणाऱ्या गतिमंद मुलीवर वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
यातील गणेश रहाटे याने या मुलीशी शारीरीक संबंध ठेवताना तुझ्या पप्पांना सांगू नकोस, नाहीतर तुझ्या आई- पप्पांना मारेन, अशी धमकी दिली होती.
नात्याने सख्खे भाऊ असलेल्या दोन संशयित तरुणांनी जबरदस्तीने वारंवार केलेल्या शारिरीक संबंधातून ही पीडित गतिमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिली आहे.
याबाबत मुलीच्या आईने देवरुख पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी दत्तात्रय रहाटे व गणेश रहाटे या दोघा भावांविरोधात भा.दं.वि.कल ३७६ (२) (एल) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्यांना देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधिशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुखच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.