रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर व ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात पुस्तक प्रदर्शन, इंग्रजी कविता, जिंगल्स, नृत्य, गाणी, भाषिक वैशिष्ट्यांवर आधारित विनोद, गंमतीदार कथा आणि रविंद्रनाथ टागोर यांची ‘द वेलकम’ नाटिका सादर करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे यांनी शेक्सपियर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सहायक शिक्षक प्रशांत जाधव यांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषा गीताचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. इंग्लिश लॅन्गवेज लर्निंग क्लबच्या प्रतिनिधींचेही कौतुक करण्यात आले.

कांबळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकणे आणि बाल लेखक, कवी बनणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून ही क्षमता विकसित होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

इंग्रजी विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी शेक्सपियर यांच्या साहित्य रचनांचे आणि शब्दसंपत्तीचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी प्रथम भारतीय इंग्रजी लेखक दीन मुहम्मद यांचेही भारतीय साहित्यातील योगदान नमूद केले. माजी प्रभारी मुख्याध्यापक स्नेहा साखळकर यांनी दैनंदिन जीवनात इंग्रजीच्या महत्त्वावर भर देत विद्यार्थ्यांना व्याकरणाचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पर्यवेक्षिका पी.एस. जाधव यांनी प्रशालेतून भावी लेखक आणि कवी घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नभा बडे, सूत्रसंचालन प्रांजल सावंत आणि आभार प्रदर्शन अस्मी पाटील या सातवीच्या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक उदय लिंगायत, शैलेंद्र औघडे, शिवाजी पांढरे, ग्रंथपाल चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख बापट-सप्रे, इंग्रजी विषय शिक्षक राहुल कांबळे, आर.व्ही. गद्रे, युवराज महाले, जीभाऊ चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.