१५ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई
रत्नागिरी : अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीजेआर फॉर्म देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या सावर्डे पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे.
मनिष कांबळे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सावर्डे पोलीस ठाणे) आणि अभिजित प्रकाश शिर्के (वय ४२, खासगी इसम) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका अपघाती गुन्ह्यातील मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळवण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करायचा होता.
या कामासाठी आवश्यक असलेले अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीजेआर फॉर्म तक्रारदाराला देण्यासाठी लोकसेवक मनिष कांबळे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, कांबळे यांनी तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि ही रक्कम चिपळूण येथील खासगी इसम अभिजित शिर्के याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार चिपळूण पोलीस स्टेशन जवळील एका जनरल स्टोअर्समध्ये सापळा रचण्यात आला. लोकसेवक कांबळे यांच्या सूचनेनुसार शिर्के याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली.
यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने शिर्के याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.

Leave a Reply