दापोली : दिशा महाराष्ट्रा संस्थेच्या वतीने रविवार, दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच विविध स्तरावरील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माध्यमिक शिक्षक आशुतोष साळुंखे यांना “राज्यस्तरीय क्रीडा रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय हौशी कबड्डी संघटनेतील (AKFI) राष्ट्रीय कबड्डी पंच, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे राज्यस्तरीय खो-खो पंच, डॉजबॉल राज्य पंच तसेच कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, बास्केटबॉल, कॅरम, पोहणे, क्रिकेट या खेळांची आवड असलेले आशुतोष साळुंखे हे NCC ‘C’ सर्टिफिकेटसह “इंटरनॅशनल सर्टिफिकेट” प्राप्त आहेत. विज्ञान व गणित विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून क्रीडा विषयाची जाण असलेल्या साळुंखे यांनी महाराष्ट्र राज्याची महाकबड्डी सिजन 2 तसेच स्टार टीव्हीवर प्रक्षेपित आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रो-कबड्डी स्पर्धा सिजन 7 ते 11 (सलग 5 वर्षे) मध्ये जयपूर, बंगलोर, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, हैदराबाद, पंचकुला (हरियाणा), ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश), दिल्ली येथे सामनाधिकारी म्हणून उत्तम कार्य पार पाडले आहे.
याशिवाय, शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विविध खेळांत प्राविण्य मिळवून देण्यात साळुंखे यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच खेळातील प्राविण्य मिळविण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. दिशा महाराष्ट्रा या युट्युब व वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी साळुंखे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करत निवड पत्र दिले असून, या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.