रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर एनसीसी ग्रुपचा प्रतिष्ठेचा ‘सीडब्ल्यूएस बेस्ट कॅडेट’ (CWS) पुरस्कार रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचा विद्यार्थी प्रेम विनोद पाटील याला जाहीर झाला आहे.
एनसीसीमधील हा एक अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो. प्रेम पाटील हा शिर्के प्रशालेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून, त्याने २०२५ मध्ये या पुरस्कारासाठीची चाचणी दिली होती.
एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना हा पुरस्कार दिला जातो. ड्रिल, परेड, लेखी परीक्षा, मुलाखत, शिबिरांमधील सहभाग, शिस्त आणि नेतृत्व क्षमता या सर्व निकषांवरील मूल्यांकनातून प्रेमची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शिर्के प्रशालेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यार्थ्याला हा पुरस्कार मिळाल्याची माहिती एनसीसी ऑफिसर आर. व्ही. गद्रे यांनी दिली.
नेतृत्वगुण, देशभक्ती, प्रशिक्षणातील गुणवत्ता आणि विविध एनसीसी उपक्रमांतील सहभागाचा गौरव करणे हा या बेस्ट कॅडेट पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
या अंतर्गत प्रेम पाटील याला रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल कमांडर दिक्षित, मुख्याध्यापक के. डी. कांबळे, एनसीसी सी.आय. केदार आंग्रे, परमेश्वर कोपले यांच्यासह शाळेतील कर्मचारी आणि रत्नागिरीकरांकडून त्याचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

