दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव येथील पर्यावरण प्रेमी आणि पत्रकार प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
हा सन्मान १ जून रोजी पुणे येथे आयोजित विशेष समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रशांत परांजपे २००१ पासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या आहेत.
यामध्ये ‘एक रोप दोन खड्डे’, मातीविरहित मचाण शेती, पालापाचोळ्यापासून खत निर्मिती, ई-वेस्टपासून स्वागत कक्ष, प्लास्टिक बाटल्यांपासून हँगिंग, बुके, बाकडी आणि फुटपाथ निर्मिती, इको-फ्रेंडली गुढी, सागरी पाण्यापासून हरितक्रांती, सर्व प्रकारच्या कचऱ्याचे विघटन, ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत निर्मिती, वृक्ष वाढदिवस, वणवामुक्त गाव योजना, पाझर खड्डे आणि जलतरे यांच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी जिरवणे, तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती यासारख्या यशस्वी संकल्पना त्यांनी साकारल्या आहेत.
परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ‘निवेदिता प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू आहे. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागात ‘जलप्रेमी’ म्हणून कार्यरत असून, २०१२ पासून जलशक्ती अभियान आणि पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करत आहेत.
तसेच, ‘पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य’ या संस्थेचे प्रमुख समन्वयक म्हणूनही ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.
पर्यावरण विषयावर त्यांचे “सुगंध वसुंधरा रक्षणाचा” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. याशिवाय, ते विविध मासिके आणि दैनिकांमधून स्तंभलेखन आणि लेखमालिकांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.
जालगाव ग्रामपंचायतीत ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोलंबो विद्यापीठाने त्यांच्या या पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.