सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग
दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील निवडणुकांचे माहोल दिसायला सुरुवात झाली आहे. दापोलीमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत.
दापोलीचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी प्रवेशाबाबतची जय्यत तयारी सुरू केली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरण्याची त्यांनी तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी आमदार संजय कदम आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यामध्ये थेट लढत यंदा पाहायला मिळणार आहे.
आ. योगेश कदम देखील विकास कामाच्या जोरावर प्रचार करत आहेत. भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या सर्व काही आलबेल नाहीये.
याच वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. भारतीय जनता पक्ष देखील दापोली विधानसभा मतदारसंघांमधून आपली दावेदारी पुढे करत आहे.
या वेळेला जर स्वतंत्रपणे लढत झाली तर भाजपा तरुण चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता जास्त आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा वेगळेच वातावरण पाहायला मिळणार आहे.
यासोबतच अपक्ष देखील या मतदार संघांमध्ये नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.
त्याचबरोबर महायुतीमध्येच असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारीही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
त्यातच दापोलीमधील विविध पक्षातील महत्वाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होत असलेला प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
महाविकास आघाडीचे पदाधिकारी सध्या या मतदारसंघांमध्ये जोर लावताना दिसत आहेत. निवडणुकीमध्ये काय होणार हे तर नंतर कळेल.
परंतु त्याची तयारी सर्वच पक्षांकडून सध्या जोमाने सुरू झाली आहे.