रत्नागिरी पोलिस निरीक्षकांकडे दिली तक्रार

रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी भारतीय जनता युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी भाजयुमो माजी अध्यक्ष राजेश मयेकर देखील उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, 24 ऑगस्ट रोजी भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आघाडी सरकारने अटक केली होती. ही घटना निंदनीय असून सरकारने सूड बुद्धीने केलेली ही कारवाई होती.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी ज्या प्रकारे कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह दमदाटी करत अटक करण्याचे आदेश दिले, ती बाब निषेधार्थ आहे. या बाबतची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या या आततायी वागण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात दैनिक सामनामध्ये ज्या पद्धतीने भडक आणि अपमानास्पद लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे, ती बाबही निषेधार्थ आहे. त्यामुळे सदर दैनिकाच्या संपादक मंडळींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

हे अटक प्रकरण नारायण राणे यांच्या ज्या विधानावरून करण्यात आले, त्या प्रकारची किंबहुना त्याहीपेक्षा वाईट विधाने आमच्या नेत्यांच्या संदर्भात संबधित पक्षाच्या नेत्यांकडून या पूर्वी करण्यात आलेली आहेत.

नारायण राणेंवरील कारवाईचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याविषयी जाहीर भाषणात काढलेले अनुद्गार सर्वश्रुत आहेत. त्या भाषणाची क्लिपसुद्धा समाजमाध्यमात प्रसारित झालेली आहे. त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

स्वतःसाठी वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका घेणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी करत आहे. वर उल्लेख केलेल्या प्रकरणात उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सामना दैनिकाचे संपादक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, संबंधितांवर त्वरित गुन्हे नोंद व्हावेत, अशी मागणी आपल्या माध्यमातून गृह विभाग आणि सरकारकडे करत आहोत. अशा पद्धतीने गुन्हे नोंद होऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यामुळे होणाऱ्या जनप्रक्षोभाची जबाबदारी आपली राहील, याची कृपया नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.