रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करून रत्नागिरी तालुक्यातील पावसनजिकच्या चांदोर येथील एका चिरेखाणी वरून ताब्यात घेतले आहे.
खाण कामगार, ट्रॅक्टर चालक म्हणून पोलीस तब्बल तीन दिवस खाणीवर काम करत होते. आरोपी संदीप भोसले हा विजय नारायण भोसले (रा. वाहिरा, बीड) या नावाने परिसरात वावर होता. गेले अनेक दिवस संदीपने चांदोर येथे वास्तव्य केल्याने त्याने या भागातही चोरीचे गुन्हे केले आहेत का ? त्याचा उलगडा लवकरच होणार आहे. राज्यभरात गुन्हे करुन मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संदीपने रत्नागिरीतच आश्रयासाठी जागा निवडली असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
कुविख्यात गुंड संदीप भोसले याने आपल्या साथिदारांसह दि. ११ जून २०१९ रोजी भरदुपारी पारनेर येथिल एका वृद्ध व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकून सोन्याचा ऐवज लंपास केला होता. त्या गुन्ह्यात संदीप अन्य आरोपींचा समावेश होता. गुन्ह्याच्या स्वरूपावरून हा गुन्हा सराईत गुन्हेगारांने
केलेला असल्याच्या शक्यतेने अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयीत आरोपी मिलन उर्फ मिलिंद ईश्वर भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १ लाख रुपये किमंतीचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी त्याने आपण संदीप भोसले, मटक भोसले, पल्या भोसले, अटल्या भोसले यांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून संदीप भोसले हा अहमदनगर जिल्ह्यामधून फरार झाला होता.
•संदीप भोसले हा रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत असलेल्या पावस नजीक चांदोर येथे •एका खाणीवर खाण कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पो.हे. कॉ. सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, पो. कॉ. सागर ससाणे
रणजित जाधव यांच्या पथकाला चांदोर येथे पाठवले होते. संदीप भोसले हा कुविख्यात गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी वेशांतर केले होते. तीन दिवसांपुर्वी पोलीस कर्मचारी चांदोर येथे दाखल झाल्यानंतर काही कर्मचारी ट्रॅक्टर चालक, तर काहीजण मजूर म्हणून तब्बल तीन दिवस काम करत होते. या कालावधीत संदीप भोसले याच्याबद्दल पोलिसांनी माहिती संकलित केली. त्यानंतर सोमवारी पहाटे संदीप राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. परंतु पोलीस आल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी संदीप भोसलेला ताब्यात घेतले. संदीप भोसले हा कर्जत येथील कुविख्यात गुन्हेगार असून
त्याच्यावर अहमदनगर, पुणे, सातारा, बीड, औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अवैद्य हत्यारे बाळगणे असे ४४ गुन्हे दाखल आहेत. तर अहमदनगर, बीड, पुणे येथे त्याच्यावर मोक्का अंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. तो एकूण २६ गुन्ह्यांमध्ये फरारी आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने संदीप भोसलेला अटक केली आहे. याबद्दल त्या पथकाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अगांवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.