दापोलीत काव्य व गझल संमेलन उत्साहात संपन्न

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोली व ललित कला फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगल कार्यालयात नुकतेच काव्य व गझल संमेलन उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शीतल मालुसरे उपस्थित होत्या.

संमेलनाची सुरुवात शाळेचे माजी शिक्षक तथा ख्यातनाम उर्दू-मराठी गझलकार बदीऊजमा खावर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहात त्यांच्या गझल-काव्याच्या वाचनाने झाली.

उर्दू साहित्यातील दिग्गज मंजर खयामी, जमालुद्दीन बंदरकर, बदरुद्दीन बदर, बशीर अहमद बशीर, सलमान मोमीन, रिजवान कारीगर, जियाऊरहमान खान जिया यांनी मुशायरा सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

मराठी-हिंदी साहित्यिकांमध्ये प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कैलाश गांधी, रेखा जगरकर आदींनी आपल्या रचना उत्कृष्टरीत्या सादर केल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनीही कविता व गझलांचे प्रभावी पठण केले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे म्हणाले, “शिक्षक-विद्यार्थ्यांनी ग्रंथसंपदेचे वाचन करून काव्य-गझलांची नवनिर्मिती करावी व या भाषांना पुन्हा चकचकित करावे.”

इकबाल परकार यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अशी संमेलने वारंवार आयोजित करावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांत साहित्याची गोडी निर्माण होईल, असे मत व्यक्त केले.

संमेलनास मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद मणियार, कॉलेज समिती अध्यक्ष आरिफ मेमन, सदस्य नाझीम काझी, हमीद बांगी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य खतीब, यू.ए. दळवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अमरा रखांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन प्रणय इंगळे व नंदिनी काळे यांनी केले. सूत्रसंचालन सलमान मोमीन व नंदिनी काळे यांनी तर आभार सादिक मुजावर व रियाज अहमद म्हैशाळे यांनी मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*