दापोली : हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व शेतकरी मेळावा जि.प. मराठी शाळा तेरेवायंगणी ता.दापोली येथे उत्साहात पार पडला.
सकाळी 10.00 वा. तेरेवायंगणी हायस्कूल व प्राथमिक शाळा तेरेवायंगणीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ , कृषी विभाग दापोलीचे सर्व कृषी अधिकारी, वन अधिकारी, गटविकास अधिकारी आर.एम. दीघे यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी व प्रभातफेरी पार पडली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक शाळा तेरेवायंगणीच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत ईशस्तवन व स्वागतगीताने झाले. कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफल व पर्यावरण पूरक कापडी पिशव्या देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय भावे, उपविभागीय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी आर.एम.दीघे, उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.कोळप, वनपाल श्री.जळणे, श्री.जगताप आदी उपस्थित होते.
उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.कोळप यांनी आपल्या प्रस्तावनेत कृषी दिनाचे महत्त्व सांगितले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख कृषी विद्यापीठ डाॅ.रमेश कुणकेरकर यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व भात लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ.प्रशांत बोडके अधिष्ठाता व प्रमुख कृषी विद्या विभाग विद्यापीठ दापोली यांनी नाचणी लागवड तंत्रज्ञान या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
सुभाष अबगुल मंडळ कृषी अधिकारी यांनी कृषी विभागातील योजना या विषयावर माहिती दिली. शेवटी डाॅ.संजय भावे कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी आपल्या ओघवत्या वाणीने शेतकऱ्यांजवळ हितगुज साधला. कोकण कृषी विद्यापीठाचे आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना फायदा करून घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाला अवश्य भेट द्यावी अशी विनंती केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल खरात तालुका कृषी अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी, रेवाळे, रोशनी जाधव, भुसारे पंचायत समिती दापोली, मनोहर करबेले सरपंच, उपसरपंच डी. एल. कोलंबे व सदस्य ग्रामपंचायत तेरेवायंगणी, नितीन शिगवण, किरण शिगवण अध्यक्ष तेरेवायंगणी ग्रामविकास मंडळ सर्व ग्रामस्थ,महिला, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम केले.