रत्नागिरी – खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर खेडमधून बदली करण्यात आली आहे. खेड पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून त्या सतत चर्चेच्या केंद्र स्नानी राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं. दरम्यान सुवर्णा पत्की यांच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आ. रामदास कदम यांनी विधान परिषदेत आवाज उठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची जोरदार मागणी केली होती. कोव्हिडचे नियम पाळले जात नाहीत असे आक्षेप त्यांनी सुवर्णा पत्कींवर घेतले.

यातच काही दिवसांपूर्वी खेड येथील गोळीबार मैदानावर मनसेने आयोजीत केलेल्या नगराध्यक्ष चषक या क्रिकेट सामन्यांच्या वेळी पोस्टरवर त्यांचा फोटो झळकला आणि त्यांच्या विरोधात वातावरण तापलं. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी या बाबत सभागृहात छायाचित्रांकित पुरावे सादर करून खेडच्या सुवर्णा पत्की या शासकीय अधिकारी आहेत की कोणत्या पक्षाच्या पदाधिकारी असा प्रश्न उपस्थित केला.

शिवाय कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खेडमध्ये क्रिकेट सामन्यांना परवानगी कशी दिली गेली. ज्या गोळीबार मैदानात क्रिकेटचे सामने रंगले होते त्या ठिकाणी हजारो प्रेक्षक होते. कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. या गर्दीत पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपिठावर उपस्थित होत्या. या सगळ्या आरोपांनंतर सुवर्णा पत्की यांची जिल्हा बदली करून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात केली होती. अखेर आठवड्याभरानंतर त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.