रत्नागिरी : शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेस मध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादी रामदास कदम यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होते असा आरोप माजी खासदार आणि भाजप चे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
या आरोपाला पलटवार करतांना दापोलीचे आमदार योगेशदादा कदम म्हणाले की, लाल दिव्याच्या गाडीसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या राणे कुटुंबीयांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही.
गेल्या दहा वर्षात फक्त आणि फक्त मंत्रिपदाच्या लालसेपोटी पहिल्यांदा काँग्रेस तिथून स्वाभिमान पक्ष आणि त्यानंतर स्वतः चा स्वाभिमान गहाण ठेवून पुन्हा भाजप अशी वारी करणाऱ्या राणेंनी ना. रामदास कदम यांच्यावर आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे.
ना. नारायण राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर शिवसेना नेते पदाची धुरा दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यामध्ये रामदास कदम यांची मुख्य भूमिका होती. ना. कदम यांना विरोधीपक्ष नेतेपद दिले.
पक्षाने भाईंना खुप दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या यादीत कदम पहिले होते अशी पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी आपली पत पक्षांमध्ये वाढविण्यासाठी केलेले हे नाटकच आहे. पण अशा संधी साधूंना कोकणातील जनता चांगलीच ओळखून आहे.
राहिला प्रश्न पालकमंत्री अनिल परब साहेब यांच्या संदर्भातील त्या ऑडीओ क्लिप्सचा … आमची भांडणं आमच्या एका घरातील आहेत. ती आम्ही एकत्र घरात बसून सोडवू यासंदर्भात निलेश राणे यांना तसदी घेण्याची गरज नाही.
ज्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्वच गोष्टी भरभरून दिल्या त्यांनी केवळ आणि केवळ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्षनेतृत्वावर बिनबुडाचे आरोप करीत पक्ष सोडला.
त्यांच्याकडून आम्हाला स्वाभिमानाचे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही असे रोखठोक मनोगत आमदार योगेश कदम व्यक्त केले.
.