दापोलीतील पावनळ जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पावनळच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून, या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याची सुरुवात सकाळी भव्य शोभायात्रेने झाली, ज्यामध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पारंपरिक दिंडी काढून परिसराचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर उद्घाटन आणि स्वागत समारंभ पार पडला, ज्यामध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

दुपारच्या सत्रात स्नेहभोजनानंतर महिलांसाठी हळदीकुंकू आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे सोहळ्यात एक वेगळीच रंगत आली.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अमृत महोत्सव कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, पावनळ ग्रामस्थ आणि मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदाने केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृतमहोत्सवी सोहळा कोर कमिटीचे अध्यक्ष अनंत मांजरेकर, उपाध्यक्ष पांडुरंग बेलोसे, सचिव संजय रामाने आणि खजिनदार अशोक मुंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कमिटी सदस्य महेश विटमल, भरत बेलोसे, दिनकर खळे, दिलीप आयरे, राजाराम दणदणे, सचिन मोहिते आणि नितेश मोहिते यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

७५ वर्षांच्या या प्रवासात शाळेने घडवलेल्या पिढ्यांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*