ऑपरेशन टायगर चा तिसरा टप्पा लवकरच – ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर दोन टप्प्यांत अनेकांना घायाळ केले असून, तिसऱ्या टप्प्यात सर्वच तालुक्यात ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी आलेल्या ना. सामंत यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.

शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर अन्य पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश लवकरच होणार आहे.

प्रत्येक तालुक्यात ही मोहीम बघायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनसाठी 360 कोटींची वाढीव मागणी करण्यात आली आहे.

अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाढवून देतो, असे सांगितले आहे. त्या निधीची आपण वाट पाहत असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

पर्यटनाच्या दृष्टीने थिबापॅलेस येथे थ्रीडी मल्टीमिडिया शोचे काम पूर्ण झाले असून, त्याचे टेस्टींग सध्या सुरु आहे. लवकरच याचा शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी दिनानिमित्त रत्नागिरीत दोन दिवस कार्यक्रम केला जाणार आहे.

यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी शहरात स्मार्ट सिटीच्या कामाबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना रत्नागिरीत राहून कामे लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 कोटी 40 लाख बहिणींनी घेतला. ही योजना सरसकट बंद होणार नसून, ज्यांच्याकडे चारचाकी गाडी, आयटी रिटर्न फाईल आहे, त्याच बहिणींना याचा लाभ मिळणार नसून यात 9 लाख महिलांचा समावेश असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*