दापोली: दापोलीच्या खेळाडूंनी रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली ताकद दाखवत दमदार कामगिरी केली आहे.
ओंकार कोळेकर यांनी ‘रत्नागिरी श्री उदय 2025’ आणि प्रवीण कांगणे यांनी ‘रत्नागिरी श्री मास्टर 2025’ चा किताब पटकावत स्पर्धेतील विजेतेपद आपल्या नावे केले.
आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी कावीळतळी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत ओंकार कोळेकर आणि प्रवीण कांगणे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्धकांना हरवले. ओंकार कोळेकर यांच्या यशात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू नंदकिशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.
दापोलीच्या ओंकार फिटनेस जिममधील खेळाडूंनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. मानव मनोज गुरव, राहुल रघुनाथ जोशी, कल्पेश महादेव पवार, मारुफ मुबिद चेलकर, अमित रमेश जाधव, विनायक तळवटकर आणि अमन बरटवाळ यांनी विविध गटांमध्ये पदके जिंकली.
या सर्व खेळाडूंना ओंकार कोळेकर हे मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू कठोर परिश्रम घेत आहेत आणि उत्तम यश मिळवत आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्व विजेत्या खेळाडूंनी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
त्यांच्या या मोठ्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
ओंकार कोळेकर याचा झाला होता अपघात
दापोली शहरातील खेळाडू ओंकार कोळेकर याने काही महिन्यांपूर्वी एका भीषण अपघातात गंभीर जखमी होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुन्हा एकदा बॉडीबिल्डिंग क्षेत्रात दमदार पुनरागमन केले आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात ओंकारच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचे भविष्य अंधारात होते.
पण ओंकारने हार मानली नाही. आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने वेदनांवर मात केली आणि पुन्हा सराव सुरू केला.
आज ओंकार केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही, तर त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून दाखवले आहे. अपघात झाल्यानंतर ओंकार आणि आजचा ओंकार यांच्यात खूप मोठा फरक आहे.

ओंकारने हे सिद्ध केले आहे की, जर तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल, तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते.
ओंकार कोळेकर यांसारख्या खेळाडूंचे यश पाहून तरुणाईला निश्चितच प्रेरणा मिळते आणि आपल्या जीवनातील ध्येय साधण्यासाठी बळ मिळते.