आंजर्ले समुद्रकिनारी एका महिलेचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून १२ जणांचा एक पर्यटक गट आज पहाटे ४ वाजता आंजर्ले येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी ११ वाजता आंजर्ले येथे पोहोचल्यानंतर त्यांनी एका रिसॉर्टवर नाश्ता केला. सायंकाळी ४:३० च्या सुमारास हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले.

पोहताना अचानक एक मोठी लाट आली आणि या लाटेत तन्वी पारखी गटातील इतर सदस्यांना दिसली नाही. तिच्या मित्रांनी तात्काळ किनाऱ्यावरील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी त्वरित समुद्रात शोधकार्य सुरू करून तन्वीला पाण्याबाहेर काढले. मात्र, ती बेशुद्ध अवस्थेत होती.

उपचारासाठी तिला तातडीने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुःखद घटनेमुळे आंजर्ले परिसरात शोककळा पसरली आहे.

Advt.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*